Recent Activities

महिला - मुलींकरिता मोफत टेलरिंग कोर्स
इंदिरानगर, तुर्भे, नवी मुबंई

कोरोना लॉक डाउन मुळे गेली दीड वर्षांपासून बंद असलेला टेलरिंग कोर्स 07 ऑगस्ट 2021पासून पुनः सुरु झाला आहे. याद्वारे एकूण 20 महिला - मुलीं प्रशिक्षण घेत आहेत.या सर्वांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी संस्थेचे विश्वस्त अतुल गोरे दर महिन्याला life skill चे सेशन घेतात, यामध्ये सर्वजणी उत्सुकतेने सहभागी होतात.
नोव्हेंबर मध्ये या वर्गाचे रिपेरिंग चे काम करण्यात आले.

बालवाडी मुलांचे विशेष कार्यक्रम तपशील

दिनांक.२६ सप्टेंबर २०२१ रोजी मुलांचे ऑनलाइन स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमात मोठा शिशू व लहान शिशू वर्गातील एकूण २० मुला-मुलींनी सहभाग घेतला होता.सर्वानी विविध गाणी व कवितावर नृत्य सादर केले.हा कार्यक्रम पाहण्यासाठी संस्थेचे मान्यवर, कर्मचारी व पालक उपस्थित होते.
दि.७ ऑक्टोंबर २०२१ रोजी मुलांना ऑनलाइन कडधान्य पेरणी करून दाखवण्याचे आयोजन केले होते.ही कृती करण्यासाठी मोठा शिशू आणि लहान शिशू वर्गातील विद्यार्थी संख्या १८ अशी होती. ही कृती करताना मुलांना खूप मज्जा आली.कारण त्यांना घरामध्ये राहूनच मातीत खेळण्याची संधी मिळाली.

सखी महिला मंडळ

कायदे व् कल्याण कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलानां सामाजिक,आर्थिक, शैक्षिणक व् राजकीय या सर्व क्षेत्रामध्ये बरोबरीने हक्क व् दर्जा मिळावा यासाठी संस्थेच्या सल्लागार सावित्री मेधातुल यांनी सखी महिला मंडळ सुरु केले आहे.
दिनांक - 28-8-2021 रोजी *सखी महिला मंडळ* चे पाहिले सेशन झाले, ह्या सेशन मध्ये सर्व उपस्थित सखींनी *थप्पड* हा हिंदी चित्रपट एकत्रितपणे पहिला. चित्रपट पाहून झाल्यानंतर सर्वांनी चित्रपटावर आधारित /संबंधित प्रश्नांवर चर्चा केली.
यामध्ये अनेक वेळा महिला निर्णय घेण्याची वेळ आली की कसं संकुचित पद्धतीने विचार करतात किंबहुना त्यानां तसा विचार करण्यासाठी भाग पाडले जातेअसे काही जणींनी आपले म्हणणे मांडले. आजकाल मालिकांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या चुकीच्या गोष्टी यावर देखील विचार मांडण्यात आले. महिला किंवा मुलीला पुरुषांपेक्षा कमी Freedom दिला जाऊ नये आणि ह्यामध्ये जो तफावत आहे तो पिढी दर पिढी पुढे जात असताना पुढच्या पिढीसाठी आपण प्रयत्नपूर्वक ही चौकट अधिकाधिक मोकळी आणि मोठी करण्याची गरज आहे. प्रत्येकीला तिला हवा तसा तिच्या आयुष्या बद्दल किंवा इतर बाबीं बद्दल विचार करताना स्वतंत्रपणे तो करता आला पाहिजे,असे मत सावित्री मेधातुल यांनी मांडले.
दिनांक - 24.09.2021 रोजी *सखी महिला मंडळ* चे दुसरे सेशन झाले. ह्या सेशन मध्ये सर्व उपस्थित सखींनी *मिर्च मसाला * हा हिंदी चित्रपट एकत्रितपणे पहिला. आठ मार्चला साजरा होणारा जागतिक महिला दिन हेही याचेच फलित आहे. अलीकडच्या काळात महिला दिन मोठ्या उत्साहात सादरा केला जातो. महिलांचे हक्क, त्यांची कर्तबगारी, त्यांनी मिळविलेले यश या साऱ्यांच्या कथा या दिवशी सांगितल्या जातात. महिला दिनाच्या निमित्ताने ते व्हायलाही हरकत नाही. मात्र, महिला दिनाला प्रतीकात्मक महत्त्व प्राप्त होऊ नये. स्त्रीला देवत्व बहाल करून, तिचा छळ करण्याची पुरुषी मानसिकता आणि महिला दिनाला प्रतीकात्मक महत्त्व वाढवून स्त्रीकडे वस्तू म्हणून पाहण्याची वृत्ती या दोहोंत फरक नाही. याचे भान समस्त समाजाला येणे आवश्यक आहे,असे मत उपस्थित पाहूण्या साहित्यक शिल्पा कांबळे यांनी मांडले.
दिनांक - २९/१०/२०२१ रोजी *सखी महिला मंडळाचे* तिसरे सेशन झाले. विषय होता प्रत्येकीने स्वतःला सर्वात जास्त आवडणारी वा न आवडणारी एखादी गोष्ट सांगायची. मग त्यात एखादा चित्रपट, गाणं, कविता इ. काहीही असू शकतं. सेशन ची सुरुवात ही कल्पना म्हात्रे व रेखा पाटील यांनी एका ओवीने झाली ही ओवी सावित्री बाई फुले यांच्या आयुष्यावर आधारित होती. त्यांनी ही ओवी गायली तसेच सर्वच सखींकडून गाऊनही घेतली. घरात रोजच्या आयुष्यात आपण सर्वच सखी प्रत्येकाची मन, आवडी निवडी जपत असतो. परंतु, क्वचितच आपल्याला ' *तुला काय आवडतं?'* हा प्रश्न विचारला जातो, बऱ्याचदा आपणही आपल्यावर जबाबदाऱ्या सांभाळताना ह्या गोष्टीकडे सोईसकर रित्या दुर्लक्ष्य करतो. बऱ्याच सखींना आपल्या घरातल्यांसमोर वक्त होता येत नाही.पण ह्या सेशन मध्ये प्रत्येकीने मनसोक्त गप्पा मारल्या ह्या गप्पांमधूनच आपला आयुष्यात येणाऱ्या संकटांकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा असावा घरात रोजच्या आयुष्यात आपण सर्वच सखी प्रत्येकाची मन, आवडी निवडी जपत असतो. परंतु, क्वचितच आपल्याला ' *तुला काय आवडतं?'* हा प्रश्न विचारला जातो, बऱ्याचदा आपणही आपल्यावर जबाबदाऱ्या सांभाळताना ह्या गोष्टीकडे सोईसकर रित्या दुर्लक्ष्य करतो. बऱ्याच सखींना आपल्या घरातल्यांसमोर व्यक्त होता येत नाही.पण ह्या सेशन मध्ये प्रत्येकीने मनसोक्त गप्पा मारल्या ह्या गप्पांमधूनच आपला आयुष्यात येणाऱ्या संकटांकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा असावा हे लक्षात येते. असे मत अनघा काकडे यांनी मांडले..
सखी महिला मंडळातील वेगवेगळ्या क्रियाकलापांमुळे सहभागी महिला-मुलींचा आत्मविश्वास आणि मनोबल तर वाढेलच पण त्यांना रोजगारप्राप्तीच्या दृष्टीने योग्य ते प्रशिक्षणदेखील मिळवून देता येईल,असा मानस सावित्री मेधातुल यांचा आहे.

कोरोना आणि पाऊस अशा दुहेरी आपत्तीतले झेंडावंदन !

दिनांक 15 ऑगस्ट 2021

दिनांक 15 ऑगस्ट रोजी 75वा स्वातंत्र्यदिन संस्थेत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे की, हा कार्यक्रम संयुक्त स्वरूपात म्हणजे प्रत्यक्षात आणि ऑनलाईन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती संध्या धारडे मॅडम (निवृत्त्त मुख्याध्यापिका - सावित्रीदेवी धीरानी विद्यामंदिर, ठाणे) यांची ऑनलाईन उपस्थिती होती. तर कार्यक्रमाचे विशेष अतिथी श्री विरेंद्र तांगरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
श्रीमती संध्या धारडे यांनी आपल्या भाषणात कोरोनाकाळात सुरु असलेल्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीत विविध उपक्रमामार्फत विद्यार्थ्यांना चांगले पूरक शिक्षण कसे देता येईल, याविषयी विचार मांडले, तसेच संस्थेने फिरती शाळा व खेळघर सुरू करावेत असेही सुचवले.
सदर कार्यक्रमांमध्ये पुढीलप्रमाणे जबाबदाऱ्या पार पाडण्यात आल्या : सूत्रसंचालन - कल्पना म्हात्रे, संस्था ओळख - माधुरी घुले, तांत्रिक व्यवस्थापन - सावित्री मेधातूल, निकिता जांगळे, सोनाली पाटील, आभार - रेखा पाटील कार्यक्रम पूर्वतयारी - ज्योती बारवे, अश्विनी मोहिते. कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त श्री अतुल गोरे, सदस्य श्री नरेश गायकर उपस्थित होते. तसेच संस्था अध्यक्ष श्री मकरंद घारपुरे, विश्वस्त श्री जयंत कुलकर्णी, लतिका सु. मो., कार्यकारी सचिव अभय कांता व इतर पदाधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

अ‍ॅटॉस सिंटेल, प्रयास फाउंडेशन यांच्या सहाय्याने घणसोलीमधील संस्थेच्या विविध शैक्षणिक प्रकल्पांशी जोडलेल्या विद्यार्थ्यांनां व् संस्थेच्या परिसरातील गरजू लोकांना धान्य वाटप. लॉकडाउन काळात अ‍ॅटॉस सिंटेलने 1000 रेशन किट वाटपाकरिता दिले आहेत.

दिनांक 28 व 29 में 2021

अ‍ॅटॉस सिंटेल यांच्या संस्थेबरोबरच्या सहभागातून मार्च २०२० पासून ऑनलाइन कॉम्प्युटर सेंटर सुरू आहे. या अंतर्गत इयत्ता 5वी ते 7वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता गणित साक्षरता (मॅथ्स लिटरसी) व 8वी ते पदवीधर विद्यार्थ्यांकरिता एनआयआयटीचे कोर्सेस चालविले जातात. या उपक्रमात ऑनलाईन एकूण 141 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेतील ऑनलाईन बालवाडी वर्ग 55 विद्यार्थी व अभ्यासिकेत शिक्षण घेत असेलेले 48 एकूण 103 विद्यार्थी, सौदंर्यप्रसाधन वर्ग 20 विद्यार्थिनी तसेच संस्थेचे माझी विद्यार्थी व परिसरातील गरजू नागरिक एकूण 736 असे एकूण 1000 जणांना रेशन किटचे वाटप करण्यात आले आहे.

*पर्यायी माध्यमांची ताकद वाढवणारा 'वी नीड यू' चा प्रबोधन पुरस्कार - मेधा पाटकर*

दिनांक २३ जानेवारी २०२१

'वी नीड यू सोसायटी'च्या वतीने सामाजिक प्रबोधन व सामाजिक परिवर्तनाच्या कामात निष्ठेने व सातत्याने ठोस भूमिका बजावणाऱ्या नियतकालिकास देण्यात येणारा पुरस्कार या वर्षी 'आंदोलन शाश्वत विकासासाठी'करिता मेधा पाटकर यांनी दिनांक २३ जानेवारी २०२१रोजी ऑनलाईन माध्यमातून स्वीकारला.या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये रोख आणि मानपत्र असे आहे.
1986 पासून सुरू झालेल्या वी नीड यू सोसायटीच्या वंचितांना जीवनशिक्षण देणाऱ्या प्रदीर्घ कामाचा आढावा संस्थेचे कार्यकारी सचिव संजीव साने यांनी घेतला. त्याआधी 'परिवर्तनाचा वाटसरू'चे संपादक अभय कांता यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सामाजिक बांधिलकी मानून निष्ठेने काम करणाऱ्या मासिकांना ज्या आर्थिक अडचणींना समोर जावं लागतं त्याला हातभार लावून वैचारिक परिवर्तनात्मक विचार प्रवाह जिवंत राहावा या हेतूने या पुरस्काराची सुरुवात केल्याचे संस्थेचे संस्थापक विश्वस्त जयंत कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
या पुरस्काराने 'आंदोलन' या मासिकाची जबाबदारी वाढल्याचे नमूद करत यापुढील काळात वैचारिक प्रवाहित्व टिकवणे व लिहिण्याची-वाचनाची सवय लावून तरुणांना आंदोलनमध्ये सामावून घेणे इथपर्यंत काम आगामी काळात करावं लागणार आहे असं 'आंदोलन' मासिकाचे कार्यकारी संपादक संजय मं. गो. यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्त्या व 'आंदोलन'च्या पूर्व कार्यकारी संपादक सुनीती सु. र. यांनी आंदोलनच्या पाव शतकी प्रवासाचा आढावा घेतला.
प्रमुख पाहुणे आणि समाजवादी चळवळीचे मार्गदर्शक श्री. गजानन खातू यांनी आंदोलन मासिकाचे वैशिष्ट्य अधोरेखित करताना म्हटले की, "आंदोलनने शोषित-वंचितांना आपला आवाज मिळवून दिला. मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमे आता सामान्य जनतेबरोबर राहिली नसल्याने लोकमानस घडविण्याचे काम आंदोलनसारखी मासिके करत असतात. आज राज्यसंस्था आणि भांडवली बाजार बलिष्ठ झाले आहेत, मात्र समाज दुर्बल होत गेला आहे, अशा वेळी परिवर्तनवादी चळवळींना बळ देणारी मासिके हवीत."
पुरस्काराला उत्तर देताना मेधा पाटकर म्हणाल्या, "आज आपला देश संकटकाळातून जात असताना 'आंदोलन'सारख्या वैचारिक मासिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. 'आंदोलन' मासिक हे देशभर सुरू असलेल्या आंदोलनांचे केवळ मुखपत्र नव्हे तर कार्यपत्र आहे. आज आंदोलनची गरज आहे कारण 'वी डोन्ट नीड यू सोसायटी' या वृत्तीचे शासनकर्ते आपल्याला लाभलेले आहेत." लोकशाही मूल्यांवर चौफेर आघात होत असताना राष्ट्रीय समन्वयासाठी एक खांब म्हणून 'आंदोलन' मासिक यापुढेही उभे राहील, असा विश्वास मेधा पाटकर यांनी दिला.
या पुरस्कार वितरण सोहळ्याची सुरुवात वाहरू सोनवणे यांच्या आंदोलन गीताने तसेच अमिताभ बच्चन यांच्या स्वरातील पसायदानाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अतुल गोरे यांनी केले. विहा पोळ यांनी मानपत्राचे वाचन केले. तर 'वी नीड यू'च्या आधी विद्यार्थिनी असलेल्या आणि आता शिक्षिका म्हणून कार्यप्रवण असणाऱ्या अनघा काकडे यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

एकलव्य गौरव पुरस्कार कार्यक्रम

दिनांक २६ सप्टेंबर २०२०

कष्ट करून ज्यांना शिकावे लागते त्यांचे श्रम, चिकाटी ही महत्वाची आहे. दहावीच्या परीक्षेत अश्या विद्यार्थ्यांनी किती टक्के मार्क मिळवले हे महत्वाचे नसून त्यांच्या या निर्धारास सलाम करण्यासाठी हा " एकलव्य गौरव पुरस्कार" घणसोली या आमच्या गावातील विद्यार्थ्यांना देण्यात येतो. गेली १६ वर्ष हा उपक्रम सुरू आहे.
या वर्षी हा पुरस्कार कार्यक्रम झूम वर *शनिवार २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते ७*यावेळेस घेण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून
*श्री. अरुण नाईक, मानोस उपचार तज्ञ्
* प्रसिद्ध सुत्रसंचालीका, लेखिका डॉ.मृण्मयी भजक
*सामाजिक राजकीय भान असणाऱ्या अभिनेत्री *उर्मिला मातोंडकर* उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये एकूण 66 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सर्व गौरव विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रक देण्यात आले व त्यांचे पुढील सर्व शिक्षण पूर्ण होई पर्यंत आवश्यक पुस्तके संस्थेकडून मोफत घेण्याचे आवाहन केले.

सौद्य्रप्रसाधन विभाग 2019-20 परीक्षा :

दिनांक 06 ते 09 में 2021

लॉकडाउनमुळे दिनांक 06 ते 09 में 2021 रोजी सौद्य्रप्रसाधन विभागातील एकुन 7 विद्यार्थिनीची परीक्षा घेण्यात आली ,यामध्ये थेअरी,प्रॅक्टीकल व् मेहंदी डिझाइन इ , चा समावेश होता. यावेळी फादर अग्नेलच्या कर्मचारी श्रीमती प्रिया देशमुख पर्यवेक्षकम्हणून उपस्थित होत्या.

सॅनटरी पॅड वाटप

दिनांक ०२ नोव्हेंबर २०२०

संस्थेला 1500 सॅनटरी पॅड डोनेशन दिले होते,प्रतेकी 10 याप्रमाणे 150 पॅकेट तयार करुण एकुन 106 मुलींना वाटप केले.

नवी मुंबई महानगर पालिका यांच्या सहकार्याने मोफत अॅन्टीजन व् RT-PCR शिबिर :

दिनांक 28 नोव्हेंबर व् 31 डिसेंबर

दिनांक 28 नोव्हेंबर व् 31 डिसेंबर रोजी संस्थेमध्ये अॅन्टीजन व् RT-PCR शिबिर आयोजित करण्यात आले होते,यावेळी संस्थेतील कर्मचारी व् विद्यार्थी अशा एकुन 115 जणांनी टेस्ट करुन घेतली,सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

COIVD-19 - एप्रिल, मे, जून 2020 या लॉकडाउन काळातील ‘वी नीड यू’ सोसायटी घणसोली, नवी मुंबई याचे तीन महत्त्वाचे मदत काययक्रम

एप्रिल, मे, जून 2020

1. NMMC, च्या सहाय्याने घणसोली मधील कष्टकरी व स्थलांतरित मजुरांना 39,944 शिजवलेल्या जेवणाचे पाकीट वाटप
2. Atos-Syntel, Sprayas Foundation, सहाय्याने घणसोली मधील विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्या कुटुबियांना धान्य वाटप
3. Lubrizol India Pvt Ltd, च्या सहकार्याने आंबेडकर/इंदिरानगर, तुर्भे येथील कंत्राटी कामगार तसेच ‘दिशा प्रोजेक्ट’ मधील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांना शिधावाटप

Read More

वार्षिक स्नेहसंमेलन

२९ फेब्रुवारी २०२०

या दिवसाची प्रत्येक विद्यार्थी अगदी आतुरतेने वाट पाहत असतो.
सांस्कृतिक सोहळा, म्हणजेच  वार्षिक स्नेहसंमेलन. स्नेहसंमेलन म्हणजे मुलांच्या विविध गुणदर्शनाचा सोहळा.
रंगीबेरंगी कपडे घालून, गालांवर रुज, ओठांवर लिपस्टिक लावून आलेली ही मुले कार्यक्रम तर छान सादर करतातच आणि आपल्या नाचाचे निवेदनही आत्मविश्वासाने करतात.
अश्या तऱ्हेने वार्षिक स्नेहसंमेलन २९ फेब्रुवारी २०२० रोजी स्त्री मुक्ती संघटनेच्या सभागृहात, कोपर खैरणे आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आले.

" महाराष्ट्रातील संत परंपरा "

22 व 23 फेब्रुवारी 2020 महाराष्ट्राला समृद्ध संतसाहित्याची आणि संत जीवनसृष्टीची परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक वातावरणाला या संत परंपरेने ढवळून काढल्याचे दाखले इतिहासात जागोजागी आढळतात, आधुनिक महाराष्ट्रातील अनेक पुरोगामी चळवळीची आणि नवसाहित्याची नाळही संतपरंपरेशी जोडली गेल्याचे दिसते. आजच्या धर्मनिरपेक्षतेच्या पलीकडे जाणाऱ्या संतपरंपरेची ज्योत तेवती ठेवण्याच्या व संतपरंपरा नव्याने समजून घेण्याच्या उद्देशाने दिनांक 22 व 23 फेब्रुवारी 2020 रोजी "महाराष्ट्रातील संत परंपरा " या वैचारिक शिबिराचे आयोजन केले होते. याकाळात डॉ सदानंद मोरे, देवदत्त परुळेकर, सचिन परब व ह भ प श्यामसुंदर सिन्नर महाराज यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ सदानंद मोरे यांनी वारकरी संप्रदायाने सर्व जातीच्या स्त्री पुरुषांना सामावून घेतले आहे, ऋषीं, मुनी, आचार्य व संत या शब्दांचा अर्थ उलगडला, त्यावेळेच्या समाजरचनेतून या संकल्पना कशा येत गेल्या, हे स्पष्ट केले. वारकरी संप्रदायाने जीवन जगण्याच्या पद्धतीतून संत शब्द अस्तित्वात आल्याचे ते म्हणाले, आत्मज्ञान होण्यासाठी कर्म करीत राहण्याचा अर्थ ज्ञानेश्वरीतून सांगितला गेला आहे, मात्र संत ज्ञानेश्वर जेव्हा रागाने ताटीत बसले होते, तेव्हा संत मुक्ताईने त्यांना संतांचा समाजाशी व्यवहार कसा असावा, याचा अर्थ ज्ञानेश्वरांना सांगितला, तसेच संत परंपरेआधीही महानुभव पंथाची विचारधारा वाढू दिली नाही, वास्तविक महानुभव पंथाची समृद्ध परंपरा अधिक खुली झाली असती तर आजची मराठी भाषा अधिक समृद्ध झाली असती, असे मत डॉ सदानंद मोरे यांनी मांडले. वारकरी संप्रदाय हा एक जातीय व एक धर्मीय नाही तर ही परंपरा अनेक सर्व जातीय व सर्व धर्मीय आहे. पूर्वी 40 मुस्लिम संत व कीर्तनकार होऊन गेले, आज 22 मुस्लिम कीर्तनकार प्रबोधनाचे कार्य करत आहेत. हे वास्तव आहे हे समजून घ्या.
वारकरी कीर्तनाची परंपरा ही चुकीच्या दिशेने जात आहे. सर्जिकल स्ट्राईक केल्यामुळे आपण मुक्त झालो इथपर्यंत मजल गेलेली आहे. खोट्या कथा सांगून जनतेला भ्रमित केले जात आहे. पाऊस न पडण्याची वैज्ञानिक कारणे न सांगता, यज्ञ न केल्यामुळे पाऊस पडत नाही, म्हणून दुष्काळ पडतो असे सांगणारे कीर्तनकार हे आव्हान आहे.
महाराष्ट्रातील संत परंपरा या वी नीड यू सोसायटीने आयोजित केलेल्या दोन दिवसीय शिबिरात ह.भ.प शामसुंदर सोन्नर महाराज "संतपरंपरे समोरील आव्हाने" या सत्रात बोलत होते. वड, पिंपळ अशी जास्त प्राणवायू देणारी झाडे तोडून यज्ञ करावे लागतात पण याबाबत संत ज्ञानेश्वर म्हणाले त्यानुसार जलाशये निर्माण करा व महावने निर्माण करा हे कीर्तनकार सांगत नाहीत. वारकरी संस्थामधून धर्मांधते विषयी प्रशिक्षण दिले जाते. मनुस्मृतीचे समर्थन संतांनी केले नव्हते पण हेच उघडपणे आज शिकवले जाते.
अहंकार हा शत्रू आहे, पण हाच अहं वारकरी परंपरेचा घात करत आहे. धर्म महत्वाचा आहेच, पण त्यातील अयोग्य परंपरा, विषमता वाढवणाऱ्या गोष्टी तसेच समाजात दूही माजवणार्या विचारा विरोधी काम करण्याची गरज आहे.
ज्ञानदेव हे वारकरी परंपरेचे संस्थापक आहेत पण त्यांचे इंजिनियर आहेत नामदेव महाराज कारण त्यांनी त्याचे कोडिंग केले. सामाजिक भेदांच्या परंपरा नाकारल्या. स्त्री पुरुष समतेचा विचार प्रत्यक्षात आणला. नामदेव महाराजांनी अभंग प्रथम लिहिला व अभंग कसे लिहावेत हे ही त्यांनी पहिल्यांदा लिहून ठेवले.
पहिला विद्रोह तुकाराम महाराजांनी व्यक्त केला. महिलेला विटाळ नसता तर पुरुषांचा जन्म तरी कसा झाला असता? असा जाहीर प्रश्न संत सोयराबाईनी विचारला. महिला पुरुषांपेक्षा खंबीर असतात, व आहेत कारण लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण एकाही शेतकरी महिलेने आत्महत्या केली नाही. हे बळ तीला वारकरी परंपरेने दिले आहे. पण आज ज्यांच्या हातात ही परंपरा आहे, त्यांनी यू टर्न घेतला आहे. प्रचारकी व खोटे वारकरी व कीर्तनकार ओळखून त्यांना उघडे पाडणे गरजेचे आहे हे मोठे आव्हान आहे. त्यास एकत्रित सामोरे जावे लागेल हे काम आपणास करावे लागेल. त्याशिवाय पर्याय नाही. दुसऱ्या सत्रात "धर्माची स्पेस व परिवर्तनवादी चळवळीची भूमिका काय असावी " या विषयावर श्री.देवदत्त परुळेकर यांनी, त्यांची पार्श्वभूमी सांगितली. एका चर्चेत डॉ.यशवंत सुमंत यांनी एक सूत्र सांगीतले की, "जेथे लोक जमतात तेथे तेथे राजकारण जन्माला येते" त्यामुळे समाजाची मानसिकता कळलेली नसेल तर परिवर्तन कसे करणार? हा प्रश्न सतावू लागला, त्यातून चिंतन करत करत या विचारापर्यत आलो की धर्म साहित्य वाचले पाहीजे. संत साहित्याने एक नवी दिशा दिली. परंपरागत, सनातनी धर्माच्या व समाजात दूही माजवणार्या सर्व विचारांना संतांनी अमान्य केले व जनतेचे प्रबोधन केले.
म.गांधींनी धर्म मानला, ते स्वतःला सनातनी हिंदू म्हणत, पण त्यांनी धर्माची स्पेस परंपरावाद्यांना वापरू दिली नाही. हे आपण समजून घेतली नाही. त्यांनी सामान्य जनतेच्या मनात असलेली धर्म व भावना दोन्ही समजून घेतली त्यामुळे सर्व धर्मीय जनता त्यांच्या मागे आली.
देव व धर्म ही व्यक्तीची मानसिक गरज आहे. यातून आलेली कर्मकांड नाकारत असताना नवीन परंपरा निर्माण करावी लागते. त्याशिवाय जुनी कर्मकांड सोडून नवीन परंपरेस मान्यता मिळत नाही. या नवीन परंपरा समतेच्या असाव्यात असा प्रयत्न करू या.
व्यक्ती नास्तिक असू शकते पण समाज नास्तिक असू शकत नाही.केवळ तर्काने व्यक्ती दुःखावर मात करू शकत नाही. म्हणून भावनेचा ओलावा असलेली नवीन परंपरा निर्माण केली पाहीजे. जे व्यक्तीचे तेच समुहाचे असते. हे समजून घेऊन नवे नाते निर्माण करा. तर परिवर्तनाच्या बाजूने समूहास उभे करणे सोपे होईल. आपले उद्दिष्ट काय आहे १) समाजाला धर्माविरुद्ध वा धर्मापलीकडे नेणे की २) समाजात माणसा माणसात असलेले विषमतेचे विचार संपवून एक नवा समतावादी समाज निर्माण करणे. आपले उद्दिष्ट दोन नंबरचे असेल तर संवादाची माध्यमे बदलावी लागतील.
परिवर्तनासाठी आपण लवचिक असले पाहिजे, लोकांना समजेल अशा भाषेत व तंत्रज्ञानाचा उपयोग करून संवाद केला व संवाद झाला, त्यानंतर समूहांनी कार्यकर्त्याला स्वीकारले तरच परिवर्तन शक्य आहे हे लक्षात घ्या. लोकांच्या सामूहिक शहाणपणावर विश्वास ठेवावा लागेल. नवीन प्रयोग करावे लागतील.

‘समाज-शिक्षण-कार्यव्रती” पुरस्कार वितरण कार्यक्रम

18 जानेवारी 2020 -

व्रत घेतलेल्या कार्यकाऱ्यांचा योग्य सन्मान - डॉ.माधव चव्हाण लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिला या तिन्ही क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आज सन्मानीत केले गेले, ही वी नीड यू संस्थेची दूरदृष्टी आहे कारण हेच तीन वर्ग आज व पुढेही संकटात असणार आहेत. त्यांचे प्रश्न अधिक तीव्र होत जाणार आहेत. त्यामुळे या क्षेत्रात कार्यरत अशा तीन कार्यकर्त्यांना आपण पुरस्कार देऊन त्यांची काम करण्याची उमेद वाढवलीत हे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन प्रथम संस्थेचे संस्थापक व शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ सोशल एंटरप्रेनर माधव चव्हाण यांनी केले.
माधव चव्हाण यांच्या हस्ते आज वी नीड यू सोसायटीच्या वतीने देण्यात येणारे "समाज-शिक्षण व कार्य व्रती" पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रत्येकास पंचवीस हजार रुपये व मानपत्र असे हे पुरस्कार असतात, यंदाचे हे चवथे वर्ष आहे.
विरार जवळील भाताने गावात ५४ निराधार मुली मुलांना सांभाळणारे व त्यांना जगण्याची नवीन दिशा दाखवणारे विशाल परुळेकर (वय ३३) यांना समाजव्रती व मुरबाड तालुक्यातील फागणे गावात ज्येष्ठ नागरिक असलेल्या आजीबाईकरता " आजीबाईची शाळा" सुरू करणारे प्राथमिक शिक्षक योगेंद्र बांगर (वय ४८) यांना " कार्यव्रती" तसेच महिलांच्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत आवाज उठवणाऱ्या व वंचित समाजातील महिलांना सक्षम करणाऱ्या नवी मुंबईतील धडाडीच्या कार्यकर्त्या प्रा.वृषाली मगदूम (वय ६५) यांना "समाजव्रती" पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
हा कार्यक्रम स्त्री मुक्ती संघटनेच्या कोपरखैरणे येथील सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.जयंत कुलकर्णी होते. या कार्यक्रमास स्त्री मुक्ती संघटना, नवी मुंबई साहित्य संस्कृती मंडळ व अन्वय या संस्थांचे सहकार्य लाभले होते. सुरवातीला वी नीड यू सोसायटीचा परिचय माधुरी घुले, स्त्री मुक्ती संघटनेचा परिचय कल्पना खंडाळकर, साहित्य संस्कृती मंडळ वाशीचा परिचय सुभाष कुलकर्णी व अन्वय संस्थेचा परिचय प्रा.अजित मगदूम यांनी करून दिला.
यावेळी बोलताना शिक्षण व्रती विशाल परुळेकर यांनी समाजात स्वतः निराधार असण्याचे दुःख भोगल्यामुळे कोणीच हे दुःख भोगू नये असे वाटत राहीले, पण समोर अशी अनेक मुली व मुले दिसत होती यांचे काय होणार? यांना जमेल तसे सांभाळले पाहिजे या प्रेरणेनेच मी व माझी पत्नी हे काम करत आहोत. प्रश्न अनेक आहेत, तुम्ही काम सुरू करा, मदतीचे हात आपोआप तुमच्या पर्यंत पोचतात. यांना आयुष्यात उभे केले तर हीच मुले भविष्यात दुसऱ्यांना मदत करतील हा विश्वास आहेच.
कार्यव्रती योगेंद्र बांगर यांनी "आजीबाईची शाळा" कशी सुरू झाली हे सांगीतले, गावात प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झालो. त्या वर्षी गावातील शिवजयंतीला ज्यांना लिहिता वाचता येते त्यांनीच हार घालायचा असे घोषित केले. कार्यक्रमानंतर आजी आल्या व म्हणाल्या आम्ही लहानपणी शाळेत गेलो नाही, पण आम्हाला शिकायचे आहे, कोण शिकविल? मी म्हणालो मी शिकवतो, यातून वय ६० ते ९४ यांची सशाला सुरु झाली. मग गाव सुधारणा सामूहिकपणे करत गेलो. आज घरात पाणी आहे जे सर्वांनी मेहनत करून अडीच की.मी.वरून आणले. प्रत्येक घरात शौचालय आहे. घरातील सर्व पाणी शोष खड्ड्यात जाते, म्हणून डास नाहीत त्यामुळे आजारपण नाही. प्रत्येक घराभोवती पाच मोठी झाडे आहेत. शाळेभोवती असलेली झाडे विद्यार्थी आजींनी लावली सांभाळली आहेत, म्हणून पर्यावरणही जपले आहे. ..
समाजव्रती वृषाली मगदूम म्हणाल्या की इतके काम आपल्या हातून झाले आहे याचे भान असे पुरस्कार देतात, पण हे काही मी एकटीने केलेले नाही.अनेक जणींचे व कुटूंवाचे हात यात एकत्र होते म्हणूनच हे काम होऊ शकला, मी निमित्त आहे पण सत्कार सर्वांचा आहे. ही पुरस्काराची रक्कम मी आधी वेगळ्या कामासाठी खर्च करणार होते. पण विशाल परुळेकर व त्याची पत्नी अंकिता यांची इतक्या लहान वयात या निराधारांची जबाबदारी बिकट आर्थिक स्थिती असताना घेतली म्हणून ही पुरस्काराची रक्कम मी विशाल परुळेकर यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रमुख पाहुणे प्रथमचे संस्थापक श्री.माधव चव्हाण यांनी अत्यंत समयोचित व छोट्या भाषणात वी नीड यू सोसायटीने या कार्यकर्त्याना शोधून काढले व आपल्या सर्वांसमोर त्यांचे काम आणले हेच मोठे कार्य आहे. समाजात आज लहान मुली-मुले, ज्येष्ठ नागरिक व महिला हे तीन वर्ग भयानक अडचणीत आहेत व त्यांचे प्रश्न अधिक गुंतागुंतीचे होणार आहेत. या क्षेत्रात आपण सर्वांनीच कार्यरत राहिले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पुरस्कार प्राप्त मान्यवर व प्रमुख पाहुणे यांचा परिचय ज्योती म्हापसेकर, विरेंद्र टांगरी व संजीव साने यांनी करून दिला तसेच कार्यक्रमाचे सूत्र संचालन लतिका सु.मो. यांनी केले. आभार प्रा.अजित मगदूम यांनी मानले. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यात गजानन खातू, डॉ.शाम घोटीकर, आनंद कुलकर्णी यांनी विशेष उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्योती बारवे, कल्पना खंडाळकर, सुभाष कुलकर्णी , विरेंद्र टांगरी, अतुल गोरे, विह पोळ यांनी तसेच चारही संस्थांच्या कार्यकर्त्यानी मेहनत घेतली. निर्मोही फडके यांनी मानपत्र तयार करण्यात व लेख लिहून मदत केली इ. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

स्पोर्ट्स डे

१२ जानेवारी २०२० -

मॅथ ललटरसी, ई- स्कूल घनसोली, ई- स्कूल तुर्भे आणि NIIT वर्गांसाठी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी Atos Syntel कंपनीने वार्षिक ‘स्पोर्ट्स डे’ कोपरखैरणे येथे ‘ज्ञान विकास’ शाळेच्या प्रांगणात आयोजित केला.
यावेळी शाळेचे चेअरमन Adv. पी. सी. पाटील व त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी भेट दिली.
त्याच बरोबर एस’प्रयासच्या चीफ मेंटॉर श्रीमती सुनीता भुयान, व्यवस्थापक रिनी सेनगुप्ता, व्यवस्थापक डेल्सी अजित, लोकेशन प्रमुख सोनू कुमारी, तसेच वी नीड यु चे विश्वस्त जयंत कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
५० मीटर धावणे, १०० मीटर धावणे, बटाटा शर्यत, चमचा गोटी, रिले शर्यत, फुगे फोडणे शर्यत आणि अडथळा शर्यत या खेळांमध्ये एकूण २२७ विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

विकास आणि पर्यावरण - श्री. अच्युत गोडबोले

- ३० नोव्हेंबर २०१९

पर्यावरण रक्षण अत्यंत महत्वाचे आहे, कारण त्यामुळे पृथ्वीवरील जीवन सातत्यपूर्ण रितीने सुरू राहील. यात मानवाने आधीच नको तितका हस्तक्षेप केलेला आहे. त्यामुळे केवळ अर्थव्यवस्थाच नाही तर मानवी जीवन संकटात सापडले आहे. यातून मानवालाच मार्ग काढावा लागेल, तो जीवन शैली बदलून काढण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.या विषयावर अच्युत गोडबोले यांनी सविस्तर विवेचन केले.
हा कार्यक्रम नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे महानगर पालिका, ठाणे येथे संपन्न झाला

सुहास जोशी सत्कार सोहळा -

२३ ऑगस्ट, २०१९

संगीत नाटक अकादमीच्या बहुप्रतिष्ठित पुरस्कारासाठी चतुरस्त्र अभिनेत्री श्रीमती. सुहासताई जोशी यांचा शुक्रवार दिनांक २३ ऑगस्ट, २०१९ रोजी यांचा ठाणेकरांच्या आणि वी नीड युच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याच कार्यक्रमाचा भाग म्हणून, प्रख्यात नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचा सुहासताई जोशी यांच्याशी अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम झाला.
संपदा जोगळेकर कुळकर्णी ह्या कार्यक्रमाच्या सुसंवादक होत्या. जयंत कुलकर्णी यांनी सुहासताईंची वेगळ्या पद्धतीने ओळख करून दिली. हा कार्यक्रम मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृह, ठाणे येथे संपन्न झाला.

लोकमान्य टिळक – आजचा संदर्भ - डॉ. आनंद नाडकर्णी

१ ऑगस्ट २०१९

लोकमान्य टिळक जयंती निमित्त डॉ. आनंद नाडकर्णी यांनी टिळकांचे बहुश्रुत व्यक्तिमत्व त्यांच्या जीवनातील महत्वपूर्ण घटनांचा आधार घेऊन उलगडून दाखवले. अष्टवधानी व्यक्ती काय व किती उत्तुंग कार्य करु शकते, याचा परिचय आपल्या ओघवत्या वक्तृत्वातून डॉ. नाडकर्णी यांनी घडवला.
हा कार्यक्रम मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ - वाशी, वी नीड यू सोसायटी, स्त्री मुक्ती संघटना व अन्वय प्रतिष्ठान - नवी मुंबई यांनी आयोजित केला होता.

एकलव्य गौरव पुरस्कार

१४ जुलै, २०१९

१४ जुलै, २०१९ रोजी एकलव्य गौरव पुरस्कार हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीगौरी सावंत आणि शेतकरी शिक्षण संस्थेचे उपमुख्याध्यापक श्री. अतुल गोसावी उपस्थित होते.
समाजातील दुर्लक्षित तृतीयपंथी, समाजाच्या न्याय हक्कांसाठी श्रीगौरी सावंत कार्यरत आहेत

प्रबोधन पुरस्कार

२५ मे २०१९

दिनांक २५ मे २०१९ रोजी ‘प्रबोधन पुरस्कार’ ‘केल्याने भाषांतर’ या त्रेमासिकाला मा. रामदास भटकळ यांच्या हस्ते देण्यात आला. श्रीमती. अनघा भट आणि श्रीमती. सुनंदा महाजन यांनी तो त्रैमासिकाच्या वतीने स्वीकारला.
तसेच या कार्यक्रमात कथा अभिवाचन - सुहास जोशी, वासंती वर्तक आणि श्रीरंग खटावकर यांनी केले.
हा कार्यक्रम थोरले बाजीराव पेशवे सभागृह, ठाणे कॉलेज, ठाणे येथे पार पडला